श्री भूमिका देवी
फार प्राचीन काळी पाल गावचा एक म्हातारा गृहस्थ “सतीच्या राईच्या ठिकाणी” “ सती” देवतेची भक्तीभावाने नित्यनियमाने पूजा करीत असे. सदर स्थान त्यांच्या राहत्या ठिकाणापासून बरेच लांब अंतरावर होते. तो गृहस्थ वृद्ध झाल्यावर इतक्या लांब अंतरापर्यंत जाऊन सतीची पूजा करणे त्याला अशक्य वाटू लागले. एके दिवशी तो वृद्ध गृहस्थ तेथे पुजेस गेला असता, त्या सतीची स्थळी हात जोडून भक्ती भावाने म्हणाला, “माझे आई, आता मजकडून होणारी तुझी ही सेवा ही शेवटची पूजा मान्य करुन घे, मला आता वृद्धापकाळामुळे उदयापासून येथे पूजेला येता येणार नाही”. एवढे बोलून तो दुःखद अंतःकरणाने आणि जड पावलांनी तेथून निघाला. देवीचा स्वप्नात दृष्टांत त्या वृद्ध गृहस्थाच्या स्वप्नात त्याच रात्री सती देवीने दृष्टांत देऊन म्हणाली, “मी तुझ्या घराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत वारुळरुपाने वाढत आहे. तेथे येऊन तू माझी पूजा करत जा मी तुला प्रसन्न आहे, मी तुझ्या इच्छा पूर्ण करीत आहे”. असे सांगून देवी अदृश्य झाली. म्हातारा गृहस्थ जागा होऊन पडलेल्या स्वप्नाचा विचार करु लागला. सकाळी उठल्यावर तो घराच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन पाहतो तो त्याला एक प्रचंड वारुळ वाढत असलेले दिसले. सती देवीने स्वप्नात दिलेले दर्शन त्याला वारुळ रुपाने प्रत्यक्ष पहायला मिळाले. रात्री पडलेले स्वप्न खरे ठरलेले पाहून त्याला अत्यंत आनंद झाला त्यावेळी त्याला प्रेमाने गहिवरुन आले. त्या आनंदाच्या भारात धावत जाऊन त्याने त्या वारुळाला मिठी मारुन म्हटले “बाये इलंस, आता इथेच थांब” त्यामुळे वारुळाची वाढ तिथेच थांबली. सदर वारुळ वाढतही नाही व कमीही होत नाही. भूमितून उगम झाल्यामुळे लोक तिला “भूमिकादेवी” असे संबोधू लागले, मात्र कागदोपत्री तिचे नाव श्री सातेरी देवी असे नमूद केलेले आहे. गावक-यांनी त्या नंतर वारुळाभोवती सुंदर व भव्य देवालय बांधले. भक्ती भावनेचे श्री भूमिकादेवी हे एक प्रतिक आहे.



