श्री देवी खाजणादेवी

श्री देवी खाजणादेवी

पाल गावचे ग्रामदैवत श्री देवी खाजणादेवी देवस्‍थान खाजणादेवीला ३६० चाळयांना तृप्‍त करण्‍यासाठी रेडयाला बळी देण्‍याची पूर्वांपार प्रथा होती.  या दिवसाला ‘रेडयाची जत्रा’ या नावाने संबोधले जाते. अलिकडच्‍या काळात या जत्रेत रेडयाऐवजी बक-याचा बळी दिला जात असला तरी पूर्वीपासून चालत आलेली ही प्रथा आजही चालू आहे. श्री खाजणादेवीची स्‍थापना केव्‍हा आणि कशी झाली याचा लेखी पुरावा (इतिहास) उपलब्‍ध नसला तरी या देवीची स्‍थापना सुमारे ७०० ते ८०० वर्षापूर्वी झाली असावी, असा अंदाज आहे.  या देवीचे  मंदीर चारी बाजूस जलमय सपाट दलदलीत शेतजमिनीत असलेल्‍या टेकडीवर वसलेले आहे.या देवीला ३६० चाळयांच्‍या गावांचा मान दिलेला आहे. “खाजना” देवीचा चाळा या नावाने तो फार प्रसिद्ध आहे. श्री खाजणादेवी ही ३६० चाळयांची अधिष्‍ठात्री आहे, असे मानले जाते.

सुमारे ७००-८०० वर्षापूर्वी गावचा एक मच्‍छीमार शेतकरी नेहमीप्रमाणे तळयावर मासे मारायला गेला असता, त्‍याचे नशीब फळाला आले. त्‍या दिवशी भरपूर मासळी त्‍याच्‍या जाळयात सापडली. त्‍याचबरोबर त्‍याच्‍या जाळयात देवीची मूर्ती सापडली.  ती कोरीव मूर्ती पाहून तो आश्‍चर्यचकित झाला. ती तेथील तळयाच्‍या काठावर व्‍यवस्थित ठेवून तो घरी आला. ज्‍या दिवशी कोळयाला मूर्ती सापडली त्‍या रात्री देवीने कोळयाला स्‍वप्‍नात दृष्‍टांत देऊन सांगितले की, “मी तुझ्या जाळयात सापडल्‍याची वार्ता सातदिवसापर्यंत कोणाला सांगू नकोस. आम्‍ही सात बहिणी असून माझ्या सर्व बहिणींना दिसण्‍याइतकी मी मोठी होणार आहे. तू माझी मूर्ती ज्‍या ठिकाणी ठेवलीस तो जमिनीचा भाग डोंगराप्रमाणे उंचच उंच होणार आहे. तरी माझा गौप्‍यस्‍प्‍फोट तू करु नकोस.” कोळयाच्‍या स्‍वप्‍नात दृष्‍टांत झाल्‍याप्रमाणे त्‍या जागेवर एका रात्रीत ५० ते ६० फूट उंच टेकडी निर्माण झाली.  एका रात्रीत एवढी मोठी डोंगर टेकडी निर्माण होणे म्‍हणजे एक अभूतपूर्व चमत्‍कार होता. दुस-याही दिवशी त्‍या मच्छिमार शेत-याला कालच्‍या तुलनेत दुप्‍पट मासळी मिळाली. आनंदाच्‍या भारात त्‍याने देवीचे गुपित बायकोला सांगितले.  यामुळे देवीचा कोप अनावर झाला, ती काळाची  व वेळेची वाट पाहत होती.  दुस-या दिवशीतो शेतकरी मच्‍छीमार गावच्‍या वडखोल वाडीत डोंगरदरीत गुरे चारावयास गेला असता वाघाने अचानकपणे झडप घालून कोळयाला ठार केले.  वडखोल वाडीत ज्‍या ठिकाणी या मच्छिमाराला वाघाने ठार मारले तेथे एक पाषाण असून तेथे आजही धार्मिक पद्धतीने प्रतिवर्षी योग्‍य तो मान दिला जातो. देवीच्‍या गुपिताचा गौप्‍यस्‍प्‍फोट  झाल्‍यामुळे वाढत जाणा-या टेकडीची वाढ खुंटली. अन्‍यथा ही टेकडी गावच्‍या डोंगरापेक्षाही उंच अशी उत्‍तुंग बनली असती.  या मंदिरापासून २ ते ३ फर्लांगावर “क्षेत्रापाल” देवतेचे स्‍थान आहे.  तेथील डोंगराळ माती व या मंदीराच्‍या नावाच्‍या टेकडीवरील माती सारखीच आहे. दैवीशक्‍तीने क्षेत्रपालाच्‍या परिसरातील माती एका रात्रीत फेकली जाऊन ती टेकडी निर्माण झाली, असा दुजोरा मिळतो. वरील घडलेला प्रकार गावच्‍या लोकांच्‍या निदर्शनास आला.  त्‍यांनी  तेथे भव्‍य मंदिर उभारून श्री खाजणदेवीची प्रतिष्‍ठापना केली.

खाजणादेवी ३६० चाळयांची अधिष्‍ठात्री आहे.  त्‍यामुळे या चाळयांना तृप्‍त करण्‍यासाठी दरवर्षी रेडयाला बळी देण्‍याची प्रथा सुरु झाली. हा बळी देण्‍यापूर्वी अवसारी देव तरंगकाठीसह आणि बलिदानासाठी असलेला बकरा बरोबर घेऊन जजसमुदाय “नागझर” येथील झ-याचे पाणी पिण्‍यासाठी घेऊन जातात.  पाणी  पिल्‍यानंतर त्‍यांच्‍या अंगात संचार होतो.  पुन्‍हा मंदिराकडे आल्‍यानंतर मंदिर प्रदक्षिणा करतात. प्र‍दक्षिणा घालते वेळी कोंबडयाच्‍या रक्‍ताचे भातात मिश्रण करुन मंदिराभोवती भात शिंपडला जातो  व चाळयाची थारावणी केली जाते.  आदल्‍या वर्षाचा रेडा बळी देण्‍यापूर्वी पुढील वर्षाचा दुसरा रेडा खाजणादेवीच्‍या चाळयाचा रेडा म्‍हणून धार्मिक विधीपूर्वक मानून सोडण्‍यात येई. रेडयाला बळी देण्‍याचा धार्मिक विधी अशाप्रकारे  पूर्ण झाल्‍यावर मंदिराचे दरवाजे बंद केले जात व मंदिराच्‍या टेकडीवरुन खाली आल्‍यावर बळी देण्‍यात येणा-या रेडयाला बांधून ठेवण्‍यात आलेला वाल (दोरखंड) तोडण्‍यात येई. हा दोरखंड तोडण्‍याचा मान कांबळी घराण्‍याकडे सुपूर्द करण्‍यात आला होता. त्‍यासाठी कांबळी घराण्‍याला जमिनी इनाम म्‍हणून सोडण्‍यात आली होती. रेडयाचे दोरखंड तोडल्‍यावर सदर रेडयाला गावातील हरिजन लोक कोयत्‍याचा वार करुन बळी देत असत. कोयत्‍याच्‍या घावाने घायाळ झालेला रेडा धडपडत धावत पळत सुटे.  तो ज्‍याच्‍या शेतात मरुन पडे, त्‍या जमिनीच्‍या मालकाला त्‍या वर्षीचे त्‍या जमिनीच्‍या तुकडयाचे संपूर्ण उत्‍पन्‍न हरिजन लोकांना दयावे लागत असे.  ही प्रथा आजही चालू आहे.  मात्र रेडयाऐवजी बक-याचा बळी दिला जातो.

रेडयाच्‍या जत्रेच्‍या दिवशी खाजणादेवीच्‍या चाळयाची थारावणी (संतृष्‍ट) केल्‍यानंतर मंदिरात कोणीही राहत नाही.  मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. अकरा दिवसापर्यंत देवीची पूजा-पाठ होत नाही.  बारावे दिवशी दरवाजे उघडले जातात व त्‍यादिवशी अभिषेक, होम, हवन, पूजा-पाठ, ब्राम्‍हण भोजन, महानैवेदय केला जात असे. (सध्‍याच्‍या चालू काळात तिस-या किंवा चौथ्‍या दिवशी हा विधी केला जातो.) रेडयाच्‍या जत्रेच्‍या एके दिवशी अशी घटना घडली की, एक लहान मुलगी मंदिरात झोपलेली होती.  देवस्‍थानाचे कार्य संपल्‍यावर मंदिराचे दरवाजे  बंद करण्‍याची प्रथा असल्‍यामुळे सर्व माणसे गडबडीने व घाईने मंदिरातून निघून जातात. देवस्‍थानच्‍या त्‍या घाईगडबडीत एकच गोंधळ निर्माण होतो.  प्रत्‍येकजण लवकर निघून जाण्‍याच्‍या घाईत असतो.  त्‍या मुलीच्‍या घरच्‍या माणसांच्‍या कोणत्‍याही घाईगडबडीत ही गोष्‍ट लक्षात आली नाही.  मंदिराच्‍या टेकडीवरुन खाली भातशेतीच्‍या मळयात आल्‍यावर  मुलगी मंदिरातच झोपलेली आहे, असे त्‍या मुलीच्‍या कुटुंबीयांच्‍या लक्षात आले.  मंदिराचे दरवाजे बंद केल्‍यामुळे पून्‍हा मंदिरात जाता येत नव्‍हते. अखेर देवीवर भरवसा ठेवून सर्व मंडळी घरी गेली. अकरा दिवस पूर्ण झाल्‍यावर बारावे दिवशी सकाळी मंदिराचे दरवाजे पूर्वांपार रुढीप्रमाणे उघडले गेले.  मंदिरात झोपलेली ती मुलगी सुखरुपपणे आनंदाने खेळत होती.  केवळ इतकेच नव्‍हे तर त्‍या मुलीच्‍या चेह-यावर प्रसन्‍नतेची व ताजेतवानेपणाची झळक दिसत होती. श्री खाजणादेवी देवी कृपेमुळेच ती मुलगी अन्‍नपाण्‍यावाचून अकरा दिवसांपर्यंत सुखरुप होती हा एक प्रकारचा दैवी चमत्‍कार घडून आला  होता. त्‍यामुळे या देवीवर गाववाल्‍यांची अपरंपार श्रद्धा आहे. त्‍याचप्रमाणे गावात श्री देवी भूमिका मंदीर, झेंडोबा मंदीर अशी मंदीरे आहेत.

Scroll to Top